Welcome

Website counter
website hit counter
website hit counters

Twitter

Follow palashbiswaskl on Twitter

Tuesday, July 23, 2013

हे आंबेडकरी बुद्धीजीवी की काँग्रेसी संघसेवक?

हे आंबेडकरी बुद्धीजीवी की काँग्रेसी संघसेवक?

July 23, 2013 at 7:42pm

गेल्या आठवड्यात नागपूरच्या संविधान चौकात `अन्न सुरक्षा कायदा झालाच पाहिजे' या मागणीसाठी नागपूरमधील बुद्धीजीवी म्हणविणाऱया विद्वानांनी धरणे आंदोलन केले. प्रा. रणजीत मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या धरणे आंदोलनात प्रा.डॉ.भाऊ लोखंडे, निरंजन वासनिक, प्रा..डॉ.विमलकीर्ति, सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी राजाभाऊ आंबूलकर आणि खासगी महाविद्यालयात अध्यापनाचे काम करणारे आजी-माजी व्याख्याते, सरकारी सेवेतून निवृत्त झालेले अधिकारी तसेच सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ता मंडळीही मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. यात माझ्यासारखे एक-दोघे पत्रकारही होते. धरणे मंडपात उपस्थित असलेल्या बुद्धीजीवींनी आपापल्या वकुबापमाणे भाषणाच्या फैरी झाडल्या. या भाषणांमध्ये अन्नसुरक्षा, उपासमारीमुळे होणारे मृत्यू, खाद्यान्न संकलन, साठवण, वितरण यामध्ये सरकारी अधिकारी, नेते, वाहतुक कंत्राटदार, भ्रष्ट व्यापारी यांनी चालविलेला भ्रष्टाचार, भारतातील भुकेची आणि अन्नावाचून मरणाऱयांची संख्या आणि यासंबंधीत इतर विषयाबाबतचे प्रबोधन कमी आणि संघपरिवार, भाजप व ब्राह्मण यावर टिका जास्त असे भाषणांचे स्वरूप होते. मध्येच वार्ताकंनासाठी वृत्तपत्र व वृत्तवाहिण्यांचे पतिनिधी आणि कॅमेरामॅन आलेच तर त्यांच्या लेन्सपुढे सर्वजन उभे राहून `अन्न सुरक्षा कायदा झालाच पाहिजे' आणि `अमुक जिंदाबाद- तमुक मुर्दाबाद' अशा घोषणा देऊन आपण अन्नसुरक्षा कायद्याविषयी किती संवेदनशील आहोत हे दर्शविण्यात येत होते. रामभाऊ आंबूलकरांचा अपवाद वगळता अन्य वक्त्यांच्या भाषणातून अन्न सुरक्षा कायद्याविषयीची माहिती अभावानेच दिली गेली. मात्र सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली डॉ. मनमोहन सिंहानी स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच देशातील गरिबांसाठी अन्नाची हमी देणाऱया योजनेचा अध्यादेश काढल्यावरुन काँग्रेस सरकारवर स्तुतीसुमने उधळण्यात आली. 

या धरणे आंदोलनाच्या पाच-सहा दिवसाआधी बुध्दगयेतील महाबोधी महाविहार परिसरात झालेल्या बॉम्बस्फोटाचा निषेध करणारे आंदोलन सतत तीन दिवस चालले होते. या आंदोलनाच्या पहिल्या दिवशी शहरभरातील तथाकथित बुध्दिजीवी, प्राध्यापक, साहित्यिक यांची उपस्थिती होती. मात्र छूटभैय्या नेत्यांच्या भाऊगर्दीत या थोर बुद्धीजीवींना वाग्बाण सोडण्याची संधी मिळाली नाही. यामुळे बुद्धगया बॉम्बस्फोट निषेध आंदोलनाच्या दुसऱया-तिसऱया दिवशी काही अपवाद वगळता प्रमुख बुध्दिजीवी या आंदोलनात दिसले नाहीत. यामुळे आपली भाषणाची तल्लफ भागविण्यासाठी बिचाऱया बुद्धीजीवींना काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांची लोकप्रिय योजना असलेल्या अन्न सुरक्षा कायद्याची भट्टी पेटवावी लागली. निवडणूका डोळ्यापुढे ठेऊन काँग्रेसने फुकट वाटण्यासाठी हातभट्टीत गाळलेल्या अन्नसुरक्षा कायद्याचे गोडवे गाण्यासाठी हे कथित बुध्दिजीवी आणि त्यांचे चेले-चपाटे गोळा होवून दिवसभर धरणे देत असतील तर हे बुद्धीजीवी आंबेडकरवादी की गांधीवादी? हे काँग्रेसचे छुपे हस्तक तर नाहीत ना? असा आम्हाला प्रश्न पडतो.
कोणत्याही समाजाला स्वतचा असा बुद्धीजीवी वर्ग असतो असे प्रसिद्ध तत्वज्ञ अँतानिओ ग्रॅम्सी या इटालियन तत्वज्ञाचे मत होते. आंबेडकरवादी चळवळीलाही असा स्वतचा बुद्धीजीवी वर्ग लाभला आहे. समाजामध्ये ज्यावेळी महापुरूष अस्तित्वात नसतो त्यावेळी समाजाला दिशा देण्याचे काम बुद्धीजीवी वर्गाने केले पाहिजे असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या प्रसिद्ध `रानडे, गांधी आणि जीना' या भाषणात सांगितले आहे. यानुसार आंबेडकरवादी समाजाला दिशा देण्याचे काम बुद्धीजीवी वर्गाने केले पाहिजे अशी अपेक्षा समाज बाळगत असेल तर ते स्वाभाविक आहे. आमच्या बुद्धीजीवींनी आपल्या वाणी आणि लेखनीतून आंबेडकरवादी विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यात काही प्रमाणात योगदान दिले आहे ही बाब कोणीही नाकारणार नाही. मात्र ही बाब सुद्धा तेवढीच सत्य आहे की, हे तथाकथित बुद्धीजीवी एका आखीव चाकोरीच्या पुढे जाऊ शकले नाही. आमच्या तथाकथित बुद्धीजीवींच्या वाणीची, लेखणीची आणि चिंतनाची झेप कथा-कविता-साहित्याच्या पुढे जाऊ शकली नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार केवळ सामाजिक, सांस्कृतिक व धम्मविषयक क्षेत्रापर्यंतच मर्यादित नव्हते. त्यांचे विचार व आंदोलन बुध्दाप्रमाणे मनुष्याला केंद्रबिंदू माणून त्यांच्या समग्र कल्याणासाठी झटणारे होते. सामाजिक, सांस्कृतिक व धम्माशिवाय शिक्षण, अर्थशास्त्र, इतिहास संशोधन, परराष्ट्र व्यवहार, विकासकेंद्री राजकारण, अशा अनेक क्षेत्राला व्यापणारे प्रगल्भ आणि व्यापक चिंतन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून दिसून येते. या समग्र विचारांचे संशोधन करून दलितांच्या आंदोलनाला वैचारिक व सैद्धांतिक पाया उपलब्ध करून देण्याचे काम आमच्या तथाकथित बुद्धीजीवींकडून झाल्याचे अभावानेच आढळते. या तथाकथित बुध्दिजीवींमध्ये कालसापेक्ष विषयाचे ज्ञान मिळविण्याची आणि त्याद्वारे समाजाला ज्ञानवंत करण्याची लालसा दिसून येत नाही. त्यांची वाणी आणि चिकित्सकपणा एका विशिष्ट क्षेत्रात संकुचित झाली आहे. त्यामुळे आजच्या बदललेल्या व प्रचंड स्पर्धात्मक बनलेल्या युगात ओघाने उद्भवलेल्या आव्हानाला सडेतोड उत्तर देण्याची बौध्दिक क्षमता आमच्या या कथित बुध्दिजीवीत विकसित होऊ शकली नाही. वयानुसार व आधी भुषविलेल्या पदानुसार ज्येष्ठत्वाचे स्थान मिळालेली अनेक मंडळी पराकोटीची द्वेषी आणि स्वार्थी झाल्याचेही अनेक दाखले देता येतील. या मंडळींनी आपल्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा उपयोग करून नव्या दमाचे लेखक, विचारवंत घडविण्याचे प्रयत्न करणे अपेक्षित होते. मात्र वक्तृत्व कौशल्य , लेखन कौशल्य असलेला एखादा नव्या दमाचा युवक समाजात लोकपिय होवू लागला तर त्याच्याविषयी नानातऱहेच्या अफवा व गैरसमज पसरवून त्याला मागे खेचण्यातही आमचे ज्येष्ठ म्हणविणारे बुद्धीजीवी कमी नाहीत. यामुळे ठिकठिकाणच्या सभा, संमेलने, जयंत्या, पुण्यतिथ्या, चर्चा, परिसंवाद अशा कार्यकमात विचारवंत, वक्ता म्हणून काही मोजकीच परंपरागत नावे वारंवार आढळून येतात. यातीलही अनेकजण गलेलठ्ठ मानधन, प्रवासासाठी पहिल्या वर्गाचे किंवा विमानाचे तिकिट, स्टेशनपासून सभास्थळापर्यंत जाण्यासाठी वातानुकुलीत गाडी, सभास्थानच्या शहरात सख्ये नातेवाईक असले तरी थांबण्यासाठी आलीशान हॉटेल याची मागणी करतात. काहीजण तर एवढे धंदेवाईक आहेत की, मिनिटे व तासाच्या आधारावर व्याख्यानासाठी मानधनाची रक्कम आकारतात. आपल्या नावापुढे प्राध्यापक नसताना प्राध्यापक, डॉक्टरेट मिळवलेली नसताना डॉक्टर अशी बिरूदावली लावतात. असे बुद्धीजीवी समाजाला काय मार्गदर्शन करणार? आणि त्यांच्याकडून कोणत्या नैतिकतेची अपेक्षा समाजाने करावी?
बुद्धीजीवी तत्वचिंतक त्याला कितीही आमिषे मिळाली तरीही आपल्या विचार आणि तत्वापासून तसूभरसुद्धा ढळत नाही. तो आपल्या ध्येयाप्रती प्रामाणिक असतो. मात्र बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा सांगणारे आमचे बुद्धीजीवी लहानश्या पदासाठी, चिल्लर पुरस्कारासाठी, टुकार सन्मानासाठी भ्रष्ट व्यावसायिकांचे, नैतिकताहीन पुढाऱयांचे आणि बेमुर्वत सत्ताधाऱयांचे उंबरठे झिजवितांना दिसतात. एकीकडे सभामंचावरून समाजाला शहाणपण शिकवितांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद म्हणायचे आणि दुसरीकडे आपल्या पद व प्रतिष्ठेसाठी गांधी आगे बढो, सोनिया आगे बढो, गडकरी आगे बढो, नितीन राऊत आगे बढो असे बोंबलायचे ही वृत्ती असेल तर अशांना समाजाचे मार्गदर्शक का म्हणायचे याचा समाजाने विचार केला पाहिजे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना समाजातील शिकल्या-सवरल्या लोकांपासून फार अपेक्षा होत्या. ते एका ठिकाणी म्हणाले होते की, माझ्या सारखा उच्च शिकलेला व्यक्ती पाचशे पदवीधर शिक्षितांची बरोबरी करु शकतो.या पार्श्वभूमीवर पुढे ते म्हणतात, ज्या समाजात दहा डॉक्टर, वीस इंजिनिअर आणि तीस वकील असतील तो समाज पगतीच्या पथावर असतो, अशी आपली दृढ संकल्पना असल्याची भावना बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्त केली होती. पण ही त्यांची भावना आमच्या समाजातील तथाकथित बुद्धीजीवी वर्गाने व्यर्थ ठरविली आहे. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर गेल्यानंतर पाच दशकापेक्षा अधिक वर्षे होत आहेत. या कालखंडात आंबेडकरी समाजात अनेक डॉक्टर, इंजिनिअर, वकील आणि सरकारी व सार्वजनिक क्षेत्रातील बड्या अधिकाऱयांची संख्या कमी नाही. या वर्गातील ज्यांनी वक्तृत्व शैली आत्मसात केली, लेखन कला अवगत केली असे लोक विशेषत अध्यापन क्षेत्रातील व्याख्याते आणि प्राध्यापक स्वत:ला बुध्दिजीवी समजून घेवू लागले. रिकामटेकड्या वेळेत एक-दोन पदव्युत्तर पदव्या घेतल्या, चार-पाच लाख खर्च करून प्रबंध लिहून घेतला व विद्यापीठातील संबंधितांना पटवून गाईडची गुलामी करून डॉक्टरेट मिळविली की, असे लोक स्वतला महान बुद्धीजीवी समजायला लागतात. यातील अनेकजण राजकीय पुढाऱयांनी चालविलेल्या शिक्षण संस्थांमध्ये नोकरीस आहेत. स्वतचे पोट जाळण्यापलीकडे या बुद्धीजीवींचा समाजाला काय उपयोग आहे हे त्यांचे त्यांनाच ठाऊक. 
सर्वच बुद्धीजीवी लोक याच पठडीतील आहेत असे माझे म्हणणे नाही. हे तेवढेच सत्य आहे की, याच वर्गातील लोकांनी आपल्या लेखनीची तलवारबाजी करुन मध्यंतरातील काळात साहित्याचा रणांगणात प्रस्थापित साहित्याला धोबीपछाड दिली होती. पण पुढे त्यांचे काय झाले? कोणी समरसतेच्या प्रवाहात वाहत गेले तर कोणी गिरीश गांधीच्या तराजूतील मारवाडी भूषण पासंग बनले. कोणी `श्री'च्या कृपेने विद्यापीठाच्या गल्लीतून दिल्लीच्या ढोलीत दाखल झाले. ज्यांना शेंडी-दांडीचा आधार लाभला नाही अशा बुद्धीजीवींचा स्वाभिमान आणि अस्मिता भलतीच उफाळून येवून त्यांनी दलित साहित्याचे फुले, आंबेडकर, बहुजन, श्रमिक असे वाटे घातले. सत्ताधाऱयांच्या जनानखाण्यावर पहारा देणाऱया अशा शिखंडीनी लढाऊ आंबेडकरवादी चळवळीची अनेक शकले पाडून या साहित्य चळवळीचे तेज व धार बोथट करुन टाकली आहे. 
अशा समाज विघातक लोकांना कोणत्या अर्थाने बुध्दिजीवी म्हणावे? हा बाका पश्न आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना पडतो. काँग्रेस पक्षाने, आंबेडकरी समाजातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, साहित्यिक अशा अनेक आघाड्यांवरील चळवळीची पध्दतशीर विल्हेवाट लावली आहे. आरक्षणाच्या आधारावर थोडीफार आर्थिक संपन्नता व सामाजिक प्रतिष्ठा पाप्त केलेल्या मागासवर्गीयांना पुन्हा गुलाम बनविण्यासाठी सरकारने सरकारी व सार्वजनिक कंपन्यांचे खाजगीकरण चालविले आहे. शिक्षणाचे बाजारीकरण आणि खाजगीकरण करुन चांगले व्यवसायीक व उच्च शिक्षण आमच्या क्षमतेच्या बाहेर नेऊन ठेवले आहे. घरकुल योजनांचे आमिष दाखवून आमच्या हक्काच्या वार्षिक अर्थसंकल्पात त्याची तरतूद करुन देखील आम्हाला आमच्या हक्काचा निवारा देण्यास नाकारला आहे. मागासवर्गीयांच्या आणि गोरगरिबांच्या जगण्या-मरण्याचा मानवीय मूलभूत मुद्दयांकडे दुर्लक्ष करण्यासाठी काँग्रेस पक्षाने आम्हाला जातीय, धार्मिक आणि भावनिक संघर्षात ढकलले आहे. मागासवर्गीय व दुर्बल घटकांच्या मानवीय अधिकारांचे होणारे हनन, या वर्गातील स्त्रियांवर होणारे बलात्कार, या घटकातील सदस्यांच्या होणाऱया हत्या, त्यांच्यावरील अन्याय-अत्याचार या सर्व घटनांना सत्तास्थानावर असलेला काँग्रेस पक्ष जबाबदार आहे. या पक्षाची लबाडी उघडी पाडण्याऐवजी आमचे बुद्धीजीवींनी काँग्रेसचे गुणगाण करावे यासारखा करंटेपणा दुसरा म्हणता येणार नाही.
आमची बुद्धीजीवी मंडळी खासकरुन छुपी काँग्रेसधार्जिणी मंडळी स्वतच्या छोट्या पद-प्रतिष्ठेसाठी आंबेडकरी समाजाची दिशाभूल करीत राहिली आहे. सभा, संमेलने, जयंत्या, पुण्यतिथ्या आणि चर्चा-परिसंवादातून विषयाला बगल देत ही आंबेडकरी समाजातील प्रस्थापित बेईमान मंडळी उपस्थितांपुढे मोठ्या आवेशाने काँग्रेसच्या पापाकडे समाजाचे दुर्लक्ष करण्यासाठी ब्राम्हणवाद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ,भाजप आणि त्यांच्या परिवारातील संस्था, संघटना यांना शिव्या-शाप देवून लोकांच्या मनावर अप्रत्यक्षपणे काँग्रेस कशी धर्मनिरपेक्ष आणि आमची तारणहार आहे, असे बिंबविण्याचा खेळ आजपर्यंत खेळत आली आहे आणि आताही खेळत आहे. त्यामुळे आमच्यामध्ये समाजाप्रती प्रचंड निष्ठा व ऊर्जा असतांना सुध्दा आम्ही आमच्या नेमक्या शत्रू विरुध्द एकसंघ होवू शकलो नाही.आणि आमची संघर्षशीलता परिणामकारक राहिली नाही.
संघ परिवार संविधानाधिष्ठीत भारताचा परंपरागत शत्रू आहे. पण या शत्रूचा हेतू साध्य करण्यासाठी अनुकूल परिस्थिती काँग्रेस पक्ष निर्माण करून देत आहे. त्यामुळे संघ परिवारा पेक्षाही काँग्रेस पक्ष संविधानाधिष्ठीत भारताच्या निर्मितीसाठी धोकादायक आहे. यामुळे देशातील परिवर्तनकारी फुले, शाहू, आंबेडकरवादी चळवळीचा कमांक एकचा शत्रू काँग्रेस आहे व संघ परिवार आणि भारतीय जनता पक्ष हे दुय्यम प्रकारचे शत्रू आहेत हे समजून घेऊन आधी काँग्रेसला समाप्त करा आणि त्यानंतर संघपरिवार व भाजपाशी मुकाबला करा असे जो सांगतो तोच खरा बुद्धीजीवी समजला पाहिजे.

मिलिंद लक्ष्मण फुलझेले

मो.नं. 9421671842

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...