माझी आत्मकथा, डॉ. बाबासाहेब आम्बेडकर.
माझी आत्मकथा, डॉ. बाबासाहेब आम्बेडकर.
हिंदूंपासून मला अश्पृश्यांचे राजकीय विभक्तीकरण मान्य नाही या युक्तिवादावर गांधीजींनी पुण्यातील येरवडा तुरुंगात प्राणांतिक उपोषण सुरु केले होते. अस्पृश्य म्हणजे त्यावेळची भारतातील हजारो जाती उपजातीतील ९ करोड दलित जनता होय. याच जणतेसाठी बाबासाहेबांनी विभक्त मतदार संघाची मागणी ब्रिटीशांकडे केली व ती त्यांनी मान्यही केली होती. त्याचे कारण बाबासाहेब पुढे म्हणतात....
अस्पृश्यांनी आपली स्थिती सुधारण्यास हातपाय हालविले की, लगेच सर्व स्पृश्य हिंदू त्यांच्यावर तुटून पडतात. अस्पृश्यांना आपली स्थिती सुधारण्याचा मार्ग खुला नाही; कारण तो हिंदूंनी रोखून धरला आहे. अशा स्थितीत अस्पृश्यांना राजकीय हक्क दिले तरच त्यांना आपली स्थिती सुधारण्याचा मार्ग दिसेल. गांधीजींनी हे हक्क मिळवून देण्यास काहीच केले नाही. उलट त्या हक्कांना ते विरोध करतात आणि वर म्हणतात की, मी अस्पृश्यांचा खरा हितकर्ता आहे. त्यांची विचारसरणी समजणे माझ्या आवाक्याबाहेर आहे. हिंदू लोक अस्पृश्यांना गुलाम म्हणून वागवितात. तेव्हा ते आपल्या हक्कांचे वाटेकरी त्यांना कधीही करणार नाहीत, अशी विचारसरणी वर्तुळ परिषदेत (राऊंड टेबल कॉन्फरन्स ) मांडून अस्पृश्यांना खास राजकीय हक्क दिले पाहिजेत, अशी मी मागणी केली. गांधीजींनी या मागणीला विरोध केला व ते आता जातीय निवाड्यातील अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांना प्राणपणाने विरोध करीत आहेत. हे त्यांचे कृत्य निश्चित अस्पृश्यांच्या हिताला बाधक आहेत. अस्पृश्यांना हिंदू समाजापासून वेगळे करण्याची आमची इच्छा नाही, हिंदूंच्या मालकीपणापासून अस्पृश्यांची सुटका व्हावी हीच एक इच्छा आहे.
पुढे विभक्त मतदारसंघ न देता संयुक्त मतदार संघात राखिव जागेला मान्यता देण्यात आली. व पुणे करार संपुष्टात आला.
पुढे बाबासाहेब म्हणतात, तुम्ही हिंदू हा जो करार करीत आहात तो नीटपणे पाळाल काय? (आवाज- हो, हो)
तुम्ही सर्व हिंदू या कराराला एक पवित्र करार म्हणून मानाल व त्याप्रमाणे वागाल अशी मी आशा करतो. हा करार घडवून आणण्यात सर तेजबहादुर सप्रू आणि श्री. रामगोपालचारी यांनी फार मेहनत घेतली. इतरांनीही खूप प्रयत्न केले. या सर्वांचा मी आभारी आहे. पण हा करार म्हणतो तसे, स्वतंत्र मतदार (विभक्तमतदार) संघाने देशाचे व हिंदू समाजाचे नुकसान होईल आणि संयुक्त मतदार संघाने फायदा होईल, ही विचारसरणी मला मान्य नाही. अस्पृश्यांची समस्या कोणत्याही राजकीय व्यवस्थेने सोडविता येणार नाही. हा करार ती समस्या सोडवू शकणार नाही. हा करार म्हणजे सर्वकाही नाही. जो पर्यंत अस्पृश्य अज्ञानी व स्वाभिमानशुन्य होते, तोपर्यंत ते तुम्ही नेमुन दिलेल्या कामावर काम करीत होते व दाखवून दिलेल्या जागेवर आमरण राहत होते. आता ते सुशिक्षित होत आहेत आणि त्यांच्यात स्वाभिमानाची ज्योत प्रज्वलित झाली आहे. यापुढे ते तुमच्या गुलामगिरीत राहणार नाहीत. एवढेच नव्हे तर, तुम्ही तुमच्या धार्मिक व सामाजिक श्रेष्ठत्त्वाच्या कल्पना टाकून न देता अस्पृश्यांशी चढेलपणाने वागू लागलात तर अस्पृश्य लोक तुमच्यापासून दूर होतील, हे लक्षात ठेवा. ही भयसुचक समस्या डोळ्यापुढे ठेवून तुम्ही अस्पृश्यांसाठी जे काही करणार असाल, ते कराल अशी मी आशा बाळगतो.
साभार,
माझी आत्मकथा,
डॉ. बाबासाहेब आम्बेडकर.
No comments:
Post a Comment